आनंदी कावळा

कथा

एका राज्यात एक कावळा असतो . तो नेहमी आनंदी असत. कोणतेच दुख ,कष्ट त्याच्या चेहऱ्यावरील आनंद हिरावून घेऊ शकत नसतात . एकदा त्या राज्याच्या राजाला ही बातमी कळते . त्याला खूप आश्चर्य वाटते , हे अशक्य आहे ,त्याचे मन खात्री देते . मग तो आपल्या शिपायांना त्या कावळ्याला पकडून आणण्याची आज्ञा देतो . कैदेत ठेवल्यावर आनंदी राहील पठ्या ! राजा मनोमन आपल्या विचारांवर खुश होता. कावळ्याला कैदेत ठेवून महिना होतो तरीही तो हसतच असतो. राजा बेचैन होतो. “प्रधानजी ,त्या कावळ्याला दुखी करण्यासाठी काय करता येईल ?” “महाराज ,आपण त्याला काट्यात टाकुया ” प्रधान तत्परतेने उपाय सुचवतो. लगेच राज्याच्या आदेशाने शिपाई त्याला काट्यात टाकतात . तिथेही हा आपला आनंदाने शीळ घालतोय . “महाराज , आपण त्याला तापलेल्या तव्यावर टाकुया ‘ राणी दूसरा उपाय सुचवते . दुसऱ्या दिवशी त्याला तापलेल्या तव्यावर टाकले जाते ,पण कीतीही चटके बसले तरी त्याच्या चेहऱ्यावरचे हसू काय मावळत नाही . “ते काय नाही महाराज , आपण याला उकळत्या तेलात टाकू “सेनापती पुढची शिक्षा सुचवतात. दुसऱ्या दिवशी भल्या मोठ्या कडईत तेल उकळून त्यात त्याला टाकले जाते . तरीही कावळा हसतोच आहे. राजाला भयंकर राग येतो . मग तो शेवटचा जालीम उपाय करायचे ठरवतो आणि त्या कावळ्याचे पंख छाटून टाकतो . पंख छाटलेला कावळा क्षीण हसतो व कायमचे डोळे मिटतो ..

लहानपणी ही गोष्ट वाचताना गंमत वाटायची . पण आता तिच्यातले मर्म काय आहे ते कळते . आपण आनंदी आहोत ,सुखी आहोत, हसत आहोत ही बाब नापसंद असणारे किती राजे आपल्या अवतीभवती असतात ना ! कधी आपल्या जवळचे आप्त ,तर कधी स्वकीय तर कधी परकीय तुम्हाला कोणत्या गोष्टिनी त्रास होईल , कशाने यातना होतील दुख होईल ? यासाठी त्यांची शक्ति खर्ची करणारे आणि त्यासाठी युक्त्या योजून अमलात आणणारे ‘प्रधान ,सेनापती यांचीही कमतरता नाही .

वास्तविक या जगात प्रत्येकजण सुखाच्या मागे धावत आहे . तरीही दुसऱ्याचा आनंद माणसाला का सहन होत नाही ? आनंदाची इतकी संकुचित संकल्पना घेऊन जगत असतो आपण की ,फक्त मला मिळायला तरच तो आनंद नाही तर नाही . त्या दुसऱ्या तो क्षणिक आनंद मिळवण्यासाठी खूप कष्ट घेतलेले आसतात तेव्हा कुठे त्याच्या वाट्याला तो छोटासा कवडसा आलेला असतो हा विचारच आपल्या मनाला शिवत नाही . इतरांच्या आयुष्यातील असे अनेक छोटे छोटे कवडसे आपण तितक्याच आनंदाने घेऊ शकलो तर आपल्या मनाच्या अंगणभर सुखाचे ऊन सदा हसत राहील ,तिथे दुखाच्या सावलीला जागाच उरणार नाही . सगळ्या जगायच सोडा हो पण आपल्या जवळच्या माणसांच्या बाबतीत हे करून पाहायला काय हरकत आहे ?

सुदैवाने भेटलाच एखादा आनंदी कावळा तर त्याच्या सोबत चार मुक्त गिरक्या घेऊन बघूया आकाशात .. त्याचे पंख छाटून त्याला संपवण्यापेक्षा आपल्या हृदयाच्या खोल खोल कप्यात त्याला कायमचा जपून ठेऊया ..


by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *